जन्मदाते

                           जन्मदाते
           गुजरातमधील वडोदरा मधे वास्तव्यास असतानाची गोष्ट. नुकताच कामावरून घरी परतलो होतो. आणि कंटाळा आल्यामुळे जमीनीवर अंग सोडल होत. तेवढ्यात आम्हाला गल्लीत राहणाऱ्या काकीनी हाक दिली की रूम मोकळी झाली आहे तुम्हाला पहायची असेल तर पाहून घ्या. तस मी व माझा मित्र ती रूम पाहण्यासाठी बाहेर पडलो. आमच्या कंपनीमध्ये महाराष्ट्रातून नवीन मुल दाखल झाली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्हाला रूम बघायची होती. तशा त्या काकी मराठी होत्या त्यामुळे आमच काम आणखीन सोप झाल. कारण परराज्यातून आलेल्या तरुणांसाठी गुजरात मधे रूम शोधन किती अवघड असत याचा मला प्रत्यय आला होता. रूम विषयी मनामध्ये अंदाज बांधत आम्ही रूमकडे  मार्गस्थ झालो.
          काकींनी रूम च कुलूप काढल व आम्ही रूममध्ये प्रवेश केला. तशी रूम ठिकठाक होती . आम्हाला पसंद पडली व आम्ही मित्रांना विचारून कळवतो अस सांगितल . याच्यानंतर आम्ही काकी राहत असलेल्या त्यांच्या घरात गेलो. मी काकीच्या चेहाऱ्याच निरीक्षण केलं त्या मला प्रचंड तणावात दिसत होत्या.तसेच त्या कोणत्यातरी विचारात मग्न असल्याचं जाणवत होत. घरात गेल्यानंतर काकिंनी आम्हाला पाणी दिलं व चहा टाकण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये निघून गेल्या. तस आम्ही काकिंना चहा नको अस सांगितल. तस बेडवर बसलेल्या काकांचा आवाज आला. "घ्या की ओ त्याला काय होतंय." आम्ही थोडा वेळात जेवण करणार असल्याचं सांगून चहाचा विषय संपवला. काकांच  साधारणपणे वय हे 65 वर्षापर्यंत असावं. ते पण मला चिंतित वाटत होते. त्यांना मी विचारलं की तुमची मुल काय करतात? तसा दोघांचा पण चेहरा पडला . त्यांनी सांगितलं की आमची मुल आमच्या सोबत राहत नाहीत. ते कधीतरी आमच्याशी बोलतात व आमच्याशी व्यवस्थित वागत नाहीत. आमचे मालक वय झालं तरी अजून देखील मजुदरी करतात व घरखर्च चालवतात. आमच कसं होईल याचीच चिंता आम्हाला लागलेली असते. ते सांगत असताना माझ्या देखील मनाला वेदना होत होत्या उतरत्या वयामध्ये मुलांनी आपल्या सोबत रहावं अस प्रत्येक आई- बापाला वाटतं असत. कदाचित ते  त्यांना देखील वाटत असावं  हे सांगत असताना मात्र दोघांचे डोळे पाणावले होते. तस आम्ही देखील विषय न वाढवता सगळ काही ठीक होईल असं सांगून त्यांचा निरोप घेतला.
               या प्रसंगामुळे माझ्या मनामध्ये मात्र विचारांचं काहूर माजलं कारण काका काकूंच्या चिंताग्रस्त चेहाऱ्यामागच दुःख काय आहे हे मला समजल होत ज्या मुलांना आई बापानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल . त्याच मुलांनी आई बापाला  उतरवयामध्ये  सोडून जावं हा किती मोठा विरोधाभास आहे . काय वाटलं असेल त्या माऊलीला .आपण समाजामध्ये अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील अनेक वृध्द जोडपी ही रस्त्यावर राहतात. गरिबीत , भिक मागून आपलं राहिलेलं आयुष्य जगत असतात. ज्या आई बापानं आपल्या भविष्यासाठी येवढ्या हालअपेष्टा सहन केल्या  अनेक खस्ता खाल्या . प्रसंगी आपल्या स्वप्नांचा त्याग करून मुलांची स्वप्ने पूर्ण केली . आणि त्याच फळ काय मिळालं  तर ही मुल 'जसा पोह्यामधून कढीपत्ता काढावा ' तस आपल्या आई बापाला दूर करतात. ही किती दुर्दैवी गोष्ट आहे .
              भारतीय संस्कृतीमधे आई वडिलांना देवासमान स्थान देण्यात आलेलं आहे. आई- वडिलांचा मान सन्मान ठेवणं व त्यांची काळजी घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आपल्या पित्याची मान स्वाभिमानाने ताठ राहावी व  आपल्या पित्याचे वचन खोटे ठरू नये म्हणून  एका क्षणात राज्यपदाचा , राजवैभवाचा , आपल्या कुटुंबाचा त्याग करून चौदा वर्षे वनवासात जाणारे श्री राम कुठे व एका मुलीच्या सांगण्यावरून आपल्या आई बापापासून दूर राहणारा मुलगा कुठे . मातृ व पितृ भक्तीच उदाहरण म्हणजे श्रावणबाळ. जो श्रावणबाळ आपल्या वृध्द व अंध आई बापाची काशी यात्रेची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः कावड घेवून आपल्या आईला व पित्याला दोन्ही बाजूला बसवून चालत काशीयात्रेला निघाला. काय म्हणावं या मुलाच्या व आई बापाच्या आपुलकीच्या व प्रेमाच्या बंधाला.  भक्त पुंडलिकाच उदाहरण तर सर्वज्ञात आहे. ज्यावेळी साक्षात भगवान पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीसाठी आले . त्यावेळी पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते . पुंडलिकाना भगवान पांडुरंग तुमच्या भेटीसाठी आल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी पुंडलिकाने मी आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न आहे . त्यामुळे मला तुमच्या भेटीसाठी विलंब होईल असे सांगितले . पुंडलिकाचे मातृ व पितृ प्रेम किती अफाट होत . साक्षात भगवंताच्या भेटीपेक्षा  आपल्या आई वडिलांच्या सेवेला त्यांनी महत्त्व दिलं. खरंच नतमस्तक व्हावस वाटत अशा मातृ व पितृ भक्तासमोर . आपल्या संस्कृती मध्ये अशी अनेक उदाहरणे असतांना खरी परिस्थिती मात्र वेगळीच दिसते.
               जगामध्ये निस्वार्थी व निर्मळ प्रेम असेल तर ते म्हणजे  आपल्या आई वडिलांच  त्यामध्ये तर आईचा खूप मोठा त्याग असतो. नऊ महिने आपल्या बाळाला पोटामध्ये सांभाळायचे . प्रसूतीच्या वेदना सहन करून नवीन बाळाला जन्म द्यायचा. जन्म दिल्यानंतर लहानाची मोठी होईपर्यंत त्याच पालन - पोषण  करायच किती त्याग आहे यामध्ये पण ती भाबडी कदीच याची वाच्यता करत नाही. मला एका गाण्याच्या ओळी येथे नमूद कराव्याशा वाटतात.

        विसरू नको रे आई - बापाला झिजवली त्यांनी काया
        काया झिजवून तुझ्या शिरावर पडली सुखाची छाया
         रे वेड्या मिळणार नाही तुला आई - बापाची माया.

         खरच वरील ओळींमध्ये किती मोठा अर्थ सामावलेला आहे . मी  स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण मला आई वडिलांच प्रेम मिळालं. मित्रहो एखाद्या अनाथ मुलाला विचारा की आई वडील नसण्याच दुःख काय असतं त्या अनाथ मुलाच्या डोळ्यातून नक्कीच अश्रू ओघळतील . लहानपणी मी एक मराठी चित्रपट पाहिला होता त्यातील एक प्रसंग मला आठवतो. एक तरुणी त्या तरुणाला म्हणते की  तू माझ्यासाठी  तुझ्या आईच काळीज आणू शकतोस काय ? त्यावेळी तो तरुण क्षणात तयार होतो . तो घरामध्ये येतो व आईच्या पोटावराती चाकूने निर्घृणपणे वार करतो व पोटातील आईच काळीज काढून घेतो व ते हातात घेवून तो तरुण त्या तरुणीच्या घराच्या दिशेने पळत सुटतो  पळता पळता त्याला ठेच लागते व तो खाली पडतो. आणि त्या काळजातून आवाज येतो ,"बाळा तुला लागलं तर नाही ना?"  खरच काय म्हणाव या आईच्या प्रेमाला. जरी समुद्राची शाई व आकाशाचा कागद केला तरीदेखील ते आपल्या जन्मदात्याची  माया लिहण्यासाठी अपुरीच आहे. आपल्या आई वडिलांचं आपल्यावर अपार अस प्रेम असतं  आपण मात्र काही भौतिक व क्षणिक सुखासाठी त्यांना आपल्यापासून दूर लोटतो. खरच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
                  आपण जे कर्म करतो त्याच पद्धतीचं फळ आपणाला मिळत असत. असा कर्माचा सिद्धांत सांगतो.  येथे मला एका अभंगाच्या ओळी नमूद कराव्याशा वाटतात.

            जगी जीवनाचे सार घ्यावे  जाणुनी सत्वर
             जैसे ज्याचे कर्म तैसे  फळ देतो रे ईश्वर.

          ईश्वर हा आपल्या चांगल्या कामाचा लेखा - जोखा ठेवत असतो व त्यानुसार आपल्या कर्माच फळ आपल्याला भेटत असत हे आपण जाणल पाहिजे . ज्यावेळी तुम्ही आपल्या आई वडिलांना दूर लोटता , त्यांचा तिरस्कार करता किंवा त्यांना अनाथाश्रमात टाकता हे सर्व ईश्वर व तुमची मुल देखील पाहत असतात. आपले आई वडील त्यांच्या आई वडिलांशी कसे वागतात . याच ते लहानपणापासून निरीक्षण करत असतात. तुम्ही जर उतार वयामध्ये  स्वतःच्या आई वडिलांची काळजी न घेता. आपल्या मुलांना  आई वडील हे  देवासमान असतात अशी शिकवण देत असाल तर मुल तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत . कारण म्हणतात ना ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले'.  जो व्यक्ती आपले विचार दुसऱ्यांना सांगण्या अगोदर स्वतः आचरणात आणतो . अशा व्यक्तींना दुनिया सलाम करते.
            शेवटी मला एवढंच सांगावस वाटत ' तुम्ही जे पेराल तेच उगवेल.' तुम्ही जर आई वडिलांसाठी तिरस्कार पेरालात तर तुमच्यासाठी देखील तिरस्काराच उगवेल तुम्ही ज अनाथाश्रम पेरलात तर तुमच्यासाठी अनाथाश्रमच उगवेल.  आणि ही वेळ तुमची स्वतःची मुल तुमच्यासाठी आणतील. याला सर्वस्वीपणे तुम्हीच जबाबदार असणार. त्यामुळे अजून ही वेळ गेली नाही आपल्या देवासमान आई वडिलांची योग्य ती काळजी घ्या. त्यांना प्रेमाने जवळ घ्या.  आपुलकीने त्यांची विचारपूस करा.  तुम्ही जर नोकरी मुळे बाहेर राहत असाल  तर किमान दोन तीन दिवसातून फोन करून त्यांची विचारपूस करा. त्यांनाही खूप बरे वाटेल.
       मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेन की आई - वडील व मुलांमधील प्रेम नेहमीच वृध्दींगत राहो 🙏🙏🙏

                                        - प्रविण कुंभार
                                        9960075883
     

     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

करड (एक ग्रामीण कथा )

Pub-G एक व्यसन .

वादळ कोरोनाचे.